Wednesday 22 April 2020

Entrepreneurship and Business in Marathi (उद्योजकता आणि व्यवसाय)


विषय: उद्योजकता आणि व्यवसाय

 

व्यवसाय अवघड आहे का? मला माझा स्वतःचा व्यवसाय करता येईल का? व्यवसायासाठी भरपूर पैसे लागतील, पण माझ्याकडे कदाचित पुरेसे पैसे नाहीत, मग मी व्यवसाय करू शकतो का? यासाठी काही विशिष्ट शिक्षणाची आवश्यकता आहे का? आणि मी माझे विश्व शून्यातून उभे करू शकतो का? हे शक्य आहे का? असे सर्व प्रश्न आपल्या मनात असतात. म्हणूनच, आपण सर्वप्रथम भूतकाळापासून बोध घेतला पाहिजे. भूतकाळाचा अभ्यास करून वर्तमानात बदल करता येतो आणि भविष्यात यशाची उंची वाढवता येते.

अशाच सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन उद्योग क्षेत्रात प्रचंड यश मिळविणाऱ्या व्यक्तींच्या यशोगाथा आणि त्यांचे अनुभव आपण पाहूयात.

पहिली यशोगाथा पाहुयात धीरूभाई अंबानी यांची. त्यांचा जन्म गुजरात मधील चोरवड गावात झाला. वडील शाळेत शिक्षक होते. घरची परिस्थिती जेमतेम होती. शाळेत असताना त्यांनी रस्त्याच्या बाजूला भजे विकले. हायस्कूल मध्येच शिक्षण सुटले. त्यानंतर कामासाठी ते येमेनला गेले. तिथे त्यांनी पेट्रोल पंपावर काम केले. तिथे काम करत असताना सुद्धा कामाच्या वेळेनंतर कुठलेही पार्टटाइम काम करत असायचे. प्रामाणिकपणे काम करता करता त्यांचे प्रमोशन होत गेले. पण त्या काळात येमेनमध्ये झालेल्या स्वातंत्र्य चळवळीमुळे ते परत भारतात आले. मुंबईला त्यांनी मसाले आणि पॉलिस्टर धाग्याचा व्यापार सुरू केला. नंतर टेक्सटाईल मिल स्थापन केली आणि 1977 ला रिलायन्स ची स्थापना केली. त्यांच्या विचारसरणी बद्दल एक छोटीशी गोष्ट उल्लेखनीय आहे. त्यांच्या मुंबईमधील सुरुवातीच्या जीवनातील हा प्रसंग आहे. तेव्हा बाहेर एक कप कॉफी एक रुपयाला मिळत होती. तेव्हा ते ताज हॉटेलमध्ये जाऊन पन्नास रुपयाची एक कप कॉफी घ्यायचे. जेव्हा त्यांना याबद्दल विचारले की बाहेर एक रुपयाची कॉफी मिळत असताना तू ताज हॉटेल ला पन्नास रुपयांची कॉफी का घेतो, तेव्हा त्यांनी सांगितले की मी मुळात कॉफी घ्यायला नव्हे तर त्या हॉटेलमध्ये येणाऱ्या शहरातील सर्व प्रभावी व्यक्तींसोबत माझी ओळख करायला जातो. माझे त्यांच्यासोबत रिलेशन वाढवण्यासाठी जातो. यावरून आपल्याला कळते की त्यांची विचारसरणी किती मोठी आणि लांब पल्ल्याची होती.

पुढची यशोगाथा आहे निरमा कंपनीची. या व्यवसायाची सुरुवात केली करसनभाई पटेल यांनी. त्यांचे केमिस्ट्री मध्ये शिक्षण झाले होते. त्यांनी त्यांच्या घराच्या बॅक यार्ड मध्येच वॉशिंग पावडर बनवायला सुरुवात केली. त्याकाळात बाजारात एका नामांकित कंपनीची वॉशिंग पावडर 13 रुपये प्रति किलोला मिळायची. करसन भाई पटेल यांनी 3 रुपये प्रतिकिलो ने वॉशिंग पावडर विकायला सुरुवात केली. सुरुवातीला जवळपासच्या परिसरामध्ये जाऊन घरोघरी पावडर विकली. कमी किमतीत चांगलं काम करणारी पावडर म्हणून डिमांड वाढली. डिमांड वाढल्यानंतर त्यांनी एक निरमा मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केले व ठरवले की जास्त विक्रीसाठी प्रत्येक दुकानात पावडर ठेवायला हवी. ते आपली पावडर घेऊन दुकाना - दुकानात गेले मात्र कुठलाच दुकानदार ती पावडर घेत नव्हता. कारण ते नवीन नाव होते आणि त्यांना रिस्क वाटत होती. तेव्हा, करसनभाईंनी आपले मित्र, नातेवाईक व कारखान्यात काम करणाऱ्या लोकांना सांगितले की आपआपल्या जवळच्या किराणा दुकानात जाऊन निरमा पावडर मागायची. असेच खूप दिवस झाले. लोक दुकानात जायचे, निरमा पावडर मागायचे पण दुकानात निरमा नसायची. मग वातावरण निर्मिती झाल्यावर पुन्हा करसनभाई प्रत्येक दुकानात निरमा घेऊन गेले व सर्व निरमा पावडरची विक्री झाली. यावरून आपल्याला कळते की प्रॉडक्ट कितीही चांगला असला तरी मार्केटिंग आणि ॲडव्हर्टायझिंगही आवश्यक आहे.

अजूनही असे भरपूर व्यक्तिमत्वांचे उदाहरणं सांगण्यासारखे आहेत. यावरून आपल्या लक्षात येते की हे शक्य आहे फक्त गरज आहे स्वप्न पाहण्याची, दृढ इच्छाशक्तीची आणि कर्म करण्याची.

पुढे आपण नोकरी आणि व्यवसाय यामधील नेमका फरक जाणून घ्यायला पाहिजे. तुम्ही जर तुमच्या नोकरीला कंटाळले आहात, काम करण्याची इच्छा होत नाही, कामाबाबतीत पण कंटाळा येतोय आणि मग विचार करताय की व्यवसाय करू, पैसा पण मिळेल आणि नोकरीपासून सुटका, तर बिझनेस तुमच्यासाठी नाही. तुमचा स्वतःचा व्यवसाय उभा करायला तुम्हाला तुमच्या नोकरीच्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेळ द्यावा लागेल काम करावे लागेल. व्यवसायामध्ये तुमचं स्वप्न असणे गरजेचे आहे, तुमची इच्छाशक्ती गरजेची आहे, मनातून तशी अंत:प्रेरणा असायलाच हवी. याउलट नोकरीमध्ये तुम्हाला फक्त जे सांगितले आहे तेच करायचे असते. सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे व्यवसायामध्ये तुम्ही नोकऱ्या देतात, करत नाही. व्यवसायामध्ये तुम्ही कित्येक लोकांना रोजगार मिळवून देतात.

मग, हे व्यवसाय म्हणजे नेमके काय? सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, लोकांना असलेल्या समस्या किंवा मागण्यांचे तुम्ही दिलेले समाधान व यामधून तुम्हाला मिळालेली मिळकत म्हणजे व्यवसाय.

पुढे, व्यवसाय कसा सुरु करता येईल हे पाहुयात. साधारणतः आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात हा विचार येत असेल की मी ही व्यवसाय करावा. माझा स्वतःचा व्यवसाय असावा. काही लोकांच्या मनात तर हा विचार खूप वर्षांपासून असेल पण करायचंय, करायचंय असंच चालू असते. प्रत्यक्षात काहीच नाही. सर्वप्रथम, आपल्याला ज्या क्षेत्रात व्यवसाय करायचा आहे त्या क्षेत्रातील यशस्वी आणि अपयशी लोकांचा अभ्यास केला पाहिजे. जे यशस्वी झालेत ते कशामुळे झाले जे अपयशी झाले ते कोणत्या कारणांमुळे झाले. आपला पैसा आपल्या व्यवसायामध्ये गुंतवण्या अगोदर या सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला पाहिजे. आपण म्हणतो ना, पाण्यात उडी मारल्या शिवाय पोहायला येत नाही. मग म्हणून सुरुवातीला आपण थेट समुद्रात उडी मारतो का? मारली तर बुडणार आणि समाज पण वेड्यात ठरवेल. पहिले कमी पाण्यामध्ये आपण सराव करतो, एकदा का ट्रेन झालो व आत्मविश्वास आला की खोल पाण्यात जातो. हीच संकल्पना व्यवसायामध्ये लागू आहे. सुरुवातीला तुमचा व्यवसाय स्मॉल स्केल वर सुरू करा, फीडबॅक घ्या, फीडबॅक प्रमाणे सुधारणा करा आणि आणि कस्टमर बेस वाढायला सुरुवात झाली की वाढ करा.

वाचनात आलेल्या एका सर्वे प्रमाणे भारतात अनेक उद्योजक निर्माण झाले, नवनवीन उद्योग सुरू झाले पण त्यातील 90 % उद्योग पाच वर्षातच बंद झाले. काय कारणं असतील हे 90 % उद्योग बंद होण्याचे? म्हणून उद्योग बंद किंवा नुकसानात कसा जातो हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. एखादा व्यवसाय नुकसानात जाण्यास कारणीभूत असलेल्या काही महत्त्वपूर्ण बाबी पुढे नमूद केलेल्या आहेत.
i)             व्यवसायामध्ये ग्राहकाला नेहमी राजा समजले पाहिजे. 'कस्टमर इज किंग'. ज्या ग्राहकाच्या तक्रारीचे तुम्ही समाधान कराल तो ग्राहक तुमच्यासोबत राहील, ज्या ग्राहकाच्या तक्रारीचे समाधान तुमच्या कडून होणार नाही ते नाखूष होऊन तुमच्या प्रतिस्पर्धी व्यवसायिकाकडे जातील. म्हणजेच तुमचा व्यवसाय कमी होईल नुकसानात जाईल.
ii)            तुमच्या ग्राहकाच्या फायद्यावर किंवा समाधानावर तुमचे नेहमी लक्ष असले पाहिजे. जर का तुम्ही तुमचा स्वतःचा फायदा विचारात घेत ग्राहकाला कनिष्ठ दर्जाचे सेवा दर्जाची सेवा अथवा माल विकायला सुरुवात केली तर तो ग्राहक निश्चितच तुमच्यापासून दूर जाईल. परिणामतः तुमचा व्यवसाय नुकसानात जाऊ शकतो.
iii)          समजा तुम्ही फंडिंग मिळवून माल तयार केला. नंतर तुम्हाला तो विकायचा आहे. मात्र विकल्यानंतर पेमेंट लवकर मिळाले नाही, तर तुम्हाला तुमचा पुढचा माल तयार करायला पैसे राहणार नाही. कदाचित तेव्हा पुन्हा तुम्हाला फंडिंग मिळणार नाही अशा प्रकाराने माल तयार करायला उशीर होऊ शकतो. परिणामतः व्यवसाय नुकसानात जाऊ शकतो. म्हणून, माल विकतानाच पूर्ण पेमेंट किंवा कमीत कमी पुढच्या मालासाठी तुम्हाला किती पैसे लागतील तेवढे तरी विकताना घ्यावे.
iv)          समजा तुम्ही नवीन व्यवसाय सुरू केलाय एक प्रॉडक्ट मार्केटमध्ये विकायला काढलाय. पण मार्केटमध्ये ते सेम प्रॉडक्ट चांगल्या कंपन्यांचे सेम प्राईस वर उपलब्ध आहे. अशा वेळेस तुमचा प्रॉडक्ट विकला जात नाही. मग तुम्ही सूट द्यायला सुरुवात केली. म्हणजे, समजा शंभर रुपयाची वस्तू दहा रुपये नुकसानाने 90 रुपयाला विकायला सुरुवात केली. आता असे भरपूर प्रॉडक्ट विकले गेले. पण प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये झालेले दहा रुपयाचे नुकसान भरून काढण्यासाठी काहीच योजना नसेल तर अशा वेळेस सुद्धा व्यवसाय नुकसानात जातो.
v)           तुम्ही एकटे व्यवसाय करू शकत नाही. तुम्हाला लोकांची गरज आहे. तुमच्या मनात असलेल्या कल्पनेला जर तुमच्यासाठी काम करणारे लोक अस्तित्वात आणू शकत असतील तर तुमचा व्यवसाय वाढेल. आजकाल कमी पगारात लोक मिळतात म्हणून ज्याला कौशल्य नाही त्याला पण नोकरीला ठेवतात आणि यामुळे व्यवसायाची वाढ मंदावते.
vi)          व्यवसाय वाढीसाठी आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा नक्कीच वापर केला पाहिजे. यामुळे तुमचा व्यवसाय जास्त दूर ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतो. व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग केल्यामुळे नक्कीच व्यवसाय वाढू शकतो.
vii)         तुम्ही तुमचा नेमका ग्राहक कोण आहे, हे ओळखले पाहिजे. समजा तुम्ही एक मजबूत, वजनाला सुद्धा हलकी, अशी वृद्ध व्यक्तींसाठी काठी बनवली. मात्र ती विकायला तुम्ही एखाद्या कॉलेज समोर गेले, तर ती काठी विकली जाणार नाही. कारण कॉलेज मध्ये तरुण असतातवृद्ध नाही. म्हणून तुमचा ग्राहक कोण आहे? कुठे आहे? याचा अभ्यास करून व्यवसायाची योजना करायला हवी.
viii)       जर का मार्केटचा कल बदलत आहे आणि तरीसुद्धा तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये त्या कालानुरूप बदल करत नसाल, तर हळू-हळू तुमच्या प्रॉडक्ट चा सेल कमी होऊन व्यवसाय नुकसानात जातो.

अंतिमतः, जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वामी विवेकानंदांची वाक्ये आपण नेहमी स्मरणात ठेवायला हवीत. "सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहेतुम्ही काहीही आणि आणि सारे काही करू शकतात. म्हणून, उठा! जागे व्हा! जोपर्यंत यश मिळत नाही, तोपर्यंत थांबू नका.”

No comments:

Post a Comment

Post Your Opinion / Feedback / Query